CM Devendra Fadanvis : पाणीपुरवठा योजनेला वेग, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाच्या हालचालींना गती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठा योजनेचे काम ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर प्रशासन अधिक सक्रिय झाले आहे. या पार्श्वभूमीवर कामाच्या गतीत वाढ करत दिवसासोबतच रात्रीही काम सुरू ठेवण्याचे आदेश कंत्राटदार कंपनीला देण्यात आले आहेत. या योजने अंतर्गत जायकवाडी जलसाठ्यात नव्याने उभारण्यात येत असलेल्या जॅकवेलमध्ये दोन पंप कार्यान्वित करून, सुमारे 200 एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
गेल्या गुरुवारी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आले. बैठकीस पोलिस आयुक्त प्रवीण पवार, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक विनय राठोड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
योजना व्याप्तीने मोठी असल्याने काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार, हे निश्चित आहे. मात्र ऑक्टोबरअखेरपर्यंत अंशतः तरी योजना कार्यान्वित होण्यासाठी जास्तीत जास्त काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जॅकवेलचे काम सध्या सुरू असून त्याला आणखी काही महिने लागणार असल्याचे स्पष्ट आहे. तरी देखील त्यातील दोन पंप कार्यान्वित करून पाणी उपसा सुरू करणे हे प्रशासनाचे प्राथमिक ध्येय असल्याचे आयुक्त गावडे यांनी स्पष्ट केले.
योजनेच्या प्रगतीसाठी उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करण्यात आलेली असून, ती न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. या समितीच्या दर महिन्याला दोन बैठकांचे आयोजन होते. गेल्या 11 महिन्यांच्या कार्यकाळात विभागीय आयुक्त गावडे यांच्या नेतृत्वाखाली एकूण 22 आढावा बैठकांचे आयोजन झाले आहे. या बैठका योजनात्मक अडचणी, प्रगतीचा वेग आणि आगामी कार्यवाही यावर केंद्रित होत्या.